स्वप्नं सगळेच पाहतात....काहींची सत्यरूप धारण करतात...काहींची स्वप्नं ही अखेर पर्यंत स्वप्नंच राहतात....जे भरकटतात त्यांची स्वप्नं कधीच पूर्ण होत नाहीत.....स्वप्नांच्या पूर्तीसाठी कष्टांची सोबत असावी लागते....ध्येयवेडा कधीच भरकटत नाही...तो आपल्या लक्ष प्राप्तीसाठी वाटेल ते करतो व आपले लक्ष प्राप्त करतो....! अश्याच एका ध्येयवेड्या मुलाचा आज समाचार घेऊ....!
वार : रविवार दिनांक २२ जानेवारी २०१२
सकाळीच फोन वाजतो... एक होस्टेल मध्ये राहणारा विद्यार्थी....त्याच्या घरून फोन असतो....तो फोन ऑन करतो....वेळ सकाळी ९.००
तो: HALLOW
बाबा : HALLOW ... काय चालू आहे...?
तो : काही नाही ....अभ्यास करत होतो....!
बाबा: अरे वा...! एवढ्या सकाळी सकाळी अभ्यास....?
तो: हो....
बाबा : तब्येत ठीक आहे न तुझी..?
तो: हो ...चांगली आहे...पण का विचारताय असं?
बाबा: एवढ्या सकाळी सकाळी अभ्यास करतो आहेस म्हणून विचारलं.
तो: नाही ...आज सकाळी पाचलाच उठलो....अभ्यासाला लागलो...
बाबा: अरे वा$$$...असाच लवकर उठत जा व अभ्यास करत जा....
तो: हो ...दररोज लवकर उठून अभ्यास करतो...रात्री पण अभ्यास करता करता खूप उशीर होतो झोपायला....
बाबा: परिक्षा जवळ आली की काय तुझी .....?
तो: नाही अजून खूप वेळ आहे ....पण आतापासून अभ्यासाला लागलो ....
बाबा: छान ...चालू दे तुझा अभ्यास ...मी नंतर फोन करेन...
तो : ठीक आहे ...(फोन DISCONNECT करतो ...)
नंतर बेड वरून उठून आळस देत रूम पार्टनर ला म्हणतो....
"बाबांचा फोन होता...बरं झालं मी पाच मिनिटांपूर्वी उठलो होतो ...नाहीतर त्यांनी माझा झोपेतला आवाज ओळखला असता ....
वेळ दुपारी २.००
त्याच्याच घरचा फोन .....आता फोन वर त्याची आई....
"काय करतोयस बेटा....?"
"मी आता college मध्ये आहे...पाच मिनिटात लेक्चर सुरु होईल...मी नंतर फोन करतो...."
फोन कट करतो...
वेळ रात्री ९.००
त्याचाच फोन ....यावेळी पुन्हा बाबा व आई दोघेही....
"काय,,,,जेवलास काय...?
"नाही अजून...जेवायलाच निघालो होतो...."
"का रे एव्हढा उशीर....?"
"college मधून आल्यावर थोडे वाचले....मग submission चे काम केले...उशीरच झाला थोडा ...आता जेऊन आल्यावर पुन्हा reading रूम मध्ये जाणार आहे..."
"ठीक आहे मग...तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा फोन कर...तब्येतीची काळजी घे....पैसे आहेत ना...? कि संपले...? अकौंट मध्ये टाकू का काही...?"
"नको...सध्या आहेत ....संपले की सांगेन मग...."
"ठीक आहे..."
फोन disconnect ...
त्याच विद्यार्थ्याची ही कालची लिहिलेली DIARY.....
दिनांक ..२१ जानेवारी २०१२ वार..शनिवार
आज सकाळी लवकर जाग आली नाही. ...दररोज पण लवकर येत नाही ...आजपण आली नाही...रात्री झोपायला उशीर झाला होता..तसा काल लवकर झोपायचा विचार होता ...बेडवर पडल्यानंतर रात्री अकराला संज्याला (रूम पार्टनर) चहा प्यायची हुक्की आली...त्याने मला जबरदस्तीने उठविले ...चहा पिण्यासाठी...मी सुद्धा "चहाचे बिल तुला द्यावे लागेल " हे त्याच्याकडून कबूल करवून घेतले व मगच उठलो.! संज्या म्हणजे एक नंबरचा "कंजूस"! याच्या खिशात नेहमी नेमके पैसे असतात..!आज तावडीत सापडला होता ....मग मी विन्या व दत्त्यालाही उठविले..ते सुद्धा संज्या चहा पाजतोय ऐकून लगेच उठले ...नंतर संज्या साला बदलेल म्हणून आम्ही पहिल्यांदा त्याचे खिसे चेक केले... त्याच्या खिश्यात वीस रुपये घ्यायला लावले व मगच रूमबाहेर पडलो....नेहमीचा चहावाला बंद होता...संज्याने हीच संधी साधली... तो म्हणाला ...
" अरे !..टपरी बंद झाली ....चला परत जाऊ."
...पण आता आम्ही तयार नव्हतो ..."पुढच्या चौकात जाऊ म्हणून पुढे गेलो...तेथेही बंद...नंतर पुढचा चौक ...असे करता करता अर्धे शहर पालथे घातले तेंव्हा कुठे "बस-stand वर चहा मिळाला...चहा मिळाल्याच्या आनंदा पेक्षा संज्याचे पैसे खर्च झाले हा आनंद आम्ही एन्जॉय करीत परत फिरलो...सगळीकडे शांतता होती......फक्त आमचाच तेवढा आवाज होता...मधेच पोलिसांची गस्तीची गाडी येतांना दिसली ..मग आम्ही गुपचूप होस्टेल वर परतलो....तेव्हा रात्रीचा एक वाजला होता...चहासाठी दोन तास गेले होते...मनात विचार आला...बाबांना हे माहित पडलं तर ते म्हणतील...."एव्हडा वेळ अभ्यासात घालविला असता तर एखादा मार्क तरी वाढला असता परिक्षेत....!
कसातरी तयार होऊन कॉलेज मध्ये गेलो, वर्गात आपल्या सीटवर बसता बसता मुक्या बाहेर corridor मध्ये फिरतांना दिसला. त्याला आवाज दिला पण त्याचे लक्ष नव्हते. मी उठून बाहेर जाणार होतो पण तेव्हढ्यात सर क्लास मध्ये आले. मग बाहेर जाता आले नाही. लेक्चर एकदम बोअर होते. नोटबुक च्या शेवटच्या पानावर सरांचे स्केच काढायचा प्रयत्न केला पण नेहमीप्रमाणे सरांचे नाक काढणे जमले नाही. मग नुसत्या सह्या करीत बसलो.. नंतरही वर्गात लक्ष नव्हतं. दुपारी शेवटचे दोन lectures off होते. मुक्या (मुकेश) सोबत बाहेर गेलो.. A T M मधून पैसे काढले ...जास्त काढायचे होते पण बाबांच्या mobile वर message जातो म्हणून कमी काढले ...नाहीतर बाबांचा लगेच फोन आला असता....मुक्याने त्याच्या घरी नेले ...त्याच्या आईने तिळाचा लाडू खायला दिला ...तेव्हा आईची आठवण झाली...तिच्या हातचे तिळाचे लाडू खूप छान लागतात...तिच्या हातचे लाडू...चिवडा...व इतर पदार्थ ....सर्वच एकदम बेस्ट...सुटीतून जेव्हा परततो तेव्हा ती सर्व प्रेमाने बांधून देते...होस्टेल वर एका दिवसात त्या सर्व फराळाचा फडशा पडतो...
मुक्याने त्याच्या गाडीवर मला होस्टेलवर सोडले व तो गेला. विन्या आज घरी जाणार होता...तो गेला असेल असे वाटले पण पक्या भेटला तो म्हणाला विन्या उद्या जाणार आहे....आमची सहल महाबळेश्वर ला जाणार होती...notice बोर्ड वर काही आले काय ते पाहायला मी आणि विठ्या पुन्हा कॉलेज मध्ये गेलो..काहीही नव्हते...तिकडे अम्या भेटला त्याला notebooks घ्यायचे होते ..आम्ही सर्व stationary दुकानात गेलो. नंतर होस्टेल वर परतलो....दुकानदाराने अम्याकडून 20 रुपये कमी घेतले होते.... चुकून..!.......ते परत देण्याच्या विचारात आम्ही होतो...पण नंतर आम्ही आमचा विचार बदलला... दुकानदार आम्हाला खूप लुटतो...म्हणून आम्ही पण पैसे परत केले नाही...आज रात्री त्या पैश्यात चहा पिऊ..! असा विचार केला.
रात्री जेवण करून परतलो . आता अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे...पण पुस्तक हातात घेतल्यावर अभ्यासात मन लागत नाही. मन इकडे तिकडे भरकटत असते. सात महिने झाले कॉलेज सुरु होऊन पण अभ्यासाला अजूनही सुरुवात झालेली नाही. परिक्षा जवळ आली की मग तारांबळ उडते...! मग अभ्यास पूर्ण होतंच नाही .तसंच परिक्षेला जावं लागते .. जे येइल ते सोडवायचे बाकी मग result ची वाट पाहण्यापलीकडे काय करू शकतो आपण...?....अश्याच काही विचारात मग वेळ निघून गेला.....अखेर शेवटी झोप येवू लागली. झोपण्या पूर्वी diary लिहावी म्हणून बसलो आहे . एवढं लिहिलं..झालं....आता झोपणार...! गुड नाईट...!
टीप : हे सर्व कुणा एकाला नजरेसमोर ठेऊन लिहिलेले नाही...हे सर्व काल्पनिक आहे...यात कुणाला "हे सर्व आपल्यावरून लिहिलेले आहे" असे वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ...!
निव्वळ योगायोग......!
No comments:
Post a Comment