सुरुवात चांगली झाली की मग पुढील कामाला एक वेगळाच उत्साह येतो. माधुरीने (माझी भाची) कालचे लिहिलेले आवडल्याचे कळविले. ते वाचून मन भूतकाळात निघून गेले. काळाचा महिमा अगाध असतो म्हणतात तेच खरे ! जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्या काळात पत्रांना खूप महत्व होते. आपल्या आप्त मित्रांना पत्रे लिहिण्यात ती आठवणीने पोस्टात नेऊन टाकण्यात जी मजा होती ती शब्दांनी व्यक्त होण्यासारखी नाही. ती मजा ज्यांनी अनुभवली आहे त्यांनाच ती माहिती आहे. पुन्हा आपण पाठविलेल्या पत्राच्या उत्तराची वाट पाहण्याची मजा सुद्धा काही वेगळीच होती. एक पत्र पाठविणे व त्याचे उत्तर येणे यात १५-२० दिवस सहज निघून जायचे. या सर्व प्रकारात एक आतुरता रहायची...एक गोडवा राहायचा...आपुलकी असायची....व बरीचशी हुरहूर पण असायची.
काळाच्या ओघात हे वरील सर्व नामशेष झालेले आहे. पत्रांची जागा पहिल्यांदा पेजर नंतर टेलिफोन, मोबाईल, इ-मेल, एस एम एस , इत्यादींनी घेतली. सर्व काही फास्ट झालेले आहे. ज्याला पत्र पाठवायचे त्याचा प्रत्यक्ष आवाज मोबाईल वर ऐकू येवू लागल्यावर कोणी कशाला ........पोस्टात जा.......पत्र विकत घ्या......ते लिहा.......पुन्हा पोस्टात जा......ते पत्रपेटीमध्ये टाका....... मग नंतर पुन्हा उत्तराची वाट पहा.......एवढा द्राविडी प्राणायाम करेल...?
टीव्ही वरील एक जाहिरात .......इंडिया हो गया 3G मे बिझी ...........पुन्हा माझा सनीला प्रश्न.....सनी ने सांगितलेली 3G ची माहिती........मी विचारात मग्न...... डोळ्यांसमोर धुके धुके........आतापर्यंत भूतकाळात गेलेले मन.......हळू हळू ...धुक्यातून.....भविष्य काळात शिरते......मी माझ्याच घरात बसलेला....केस पूर्ण पांढरे झालेली सुनिता सोबत बसलेली.....माझ्या टकलावर पण पडक्या किल्ल्यासारखे भग्नावशेष उरलेले....आजूबाजूंच्या घरांवर दिव्यांच्या माळा.......सायंकाळची वेळ......तेवढ्यात फोन वाजतो.....
"ए.....पहा जरा कोण आहे ते......." मी सुनिताला सांगतो.
"सनीचा फोन आहे ......."सुनिता उत्तरते.
"बघ काय म्हणतो ते...."
"तुम्हीच बोला त्याच्याशी..."
"का....?"
"दुपारीच आमचं बोलणं झालं.......या दिवाळीत घरी यायचं नाही म्हणतो तो......"
मी फोन बंद होण्याच्या आत घाईघाईत उचलतो....."हल्लो सनी....."
"हल्लोव बाबा ....आईने सांगितले काय तुम्हाला....."
"काय ते....?"
"बाबा आम्ही या वेळी दिवाळीत बुलडाण्याला नाही येवू शकणार......सॉरी बाबा पण अत्यावश्यक काम निघालं......नाही येता येणार.... ही पण माहेरी जाणार नाही.....तुमचा छोट्या तर भाऊआजोबांना भेटायला उतावीळ झाला आहे ......पण नाईलाज झाला हो.....आईला दुपारी सांगितलं ......ती नाराज झाली...." हळू हळू त्याचा आवाज रडवेला झालेला......
मी माझ्या डोळ्यांच्या कडा पुसत परंतु संयमाने...कातरस्वरात .. "अरे...नाराज कशाला होतो आहेस......आपले 3G connection आहे न...सोनी च्या ४० इंची monitor समोर बसून आम्ही इकडे लक्ष्मी देवीची पूजा करू......तुम्ही तिकडून हात जोडा.......आम्ही कॅमेरा समोर आमचे पाय ठेवू ..... तुम्ही तिकडून नमस्कार करा......तुझा छोट्या तिकडे कॅमेरा समोर फटाके उडवील आम्ही स्क्रीन वर बघून आमचे डोळ्यांचे पारणे फेडू......!......!!.....!!!.....!!!!!
No comments:
Post a Comment