माणसाचं मन म्हणजे एक विचित्र रसायन आहे. मानवाची निर्मिती उत्क्रांती मधून झाली हे जरी सर्वमान्य असले तरी, म्हणजे माकडापासून माणूस निर्माण झाला हे जरी सर्वमान्य असले तरी एक मात्र निश्चित आहे, ज्या प्रकारच्या माकडापासून माणूस झाला ते माकडही त्या काळातल्या (म्हणजे माकडाचे माणसांत रुपांतर होण्याच्या आधीच्या काळातल्या) अन्य सर्व माकडामद्धे नक्कीच "इब्लीस" म्हणूनच प्रसिद्ध असावे! तसं नसतं तर कदाचित त्याला माणूस होताही आलं नसतं! ....ते माकड इब्लीस असेल म्हणूनच त्याने त्या काळातल्या इतर माकडांप्रमाणे फक्त झाडांवर इकडून तिकडे उड्या मारण्यात समाधान मानले नसेल ,.... रानावनातील कंद मूळे खाऊन तृप्तीची ढेकर दिली नसेल,.... की "आपण भले नि आपले माकडचाळे भले" असा मोलाचा संदेशही मनावर बिंबवून घेतलेला नसेल...! त्याने निश्चितच त्या काळातही काहीतरी नवे करण्याची जिद्द आपल्या उराशी बाळगली असेल! एखादा उनाड मुलगा जसे त्याच्या वयातील इतर मुलांपेक्षा वेगळा वागतो तसे तो वागत असेल. म्हणूनच आजही एखादा बाप जेंव्हा आपल्या उनाड मुलाला, "माकडचाळे करू नकोस " असे म्हटल्याचे मी ऐकतो तेव्हा प्रत्येक वेळी हा मुलगा मोठेपणी काहीतरी वेगळा असामान्य व्यक्ती होणार आहे असे मला उगीचच वाटत असते!
काही का असेना....अश्या उनाडक्या करूनच माणसाने आपली प्रगती केली आहे. म्हणूनच हे सर्व लिहिण्याच्या आधी माझ्या मनात विचार आला होता..."माणसाचं मन म्हणजे एक विचित्र रसायन आहे"...आजही आपण आपल्या आजूबाजूला वावरतांना पाहतो.... जो सरळमार्गी, चाकोरीबद्ध जीवन जगतो..तो सर्वसामान्य, मध्यमवर्गीय या कॅटेगरी मध्ये मोडतो....तो नेहमी नियमानुसार वागतो ....तो लहानपणापासूनच असा असतो...म्हणजे अगदी पहिली -दुसरीत असतांना गुरुजींनी "तोंडावर बोट ठेवा" असे सांगितल्यानंतर त्यांनी "तोंडावरून बोट काढा" असे सांगेपर्यंत ह्याचे बोट प्रामाणिकपणे तोंडावरच राहणार...! उनाड मुलांप्रमाणे तो कधीही गुरुजींचा डोळा चुकवून एका सेकंदासाठी का होईना ..एकदाही तोंडावरून बोट काढणार नाही...मधूनच खी$क करून हसणार नाही .....जीवनाचा कुठलाही आनंद चोरून घेणार नाही ....सर्व आयुष्य प्रामाणिकपणे जगणार....समाजाला घाबरणार .....कुणी आपल्याला नाव ठेवू नये याची दक्षता घेणार...आदर्श जीवन जगत असल्याचा आव आणणार .....स्वतःच्या आवडी-निवडींना मुरड घालणार....वयात आल्यानंतर एखाद्या मुलीवर प्रेम करीत असतांना तिला कधीही ते माहित होऊ देणार नाही...तिनेच पुढाकार घेतला तरी रक्षाबन्धनाला तिच्या घरी जाऊन तिच्या आई-वडिलांसमोर तिला राखी बांधायला भाग पाडणार...!!!
लिहिता लिहिता बहुतेक थोडा भरकटलो आहे...म्हणूनच हे सर्व लिहिण्याच्या आधी माझ्या मनात विचार आला होता..."माणसाचं मन म्हणजे एक विचित्र रसायन आहे"...जो सरळमार्गाने न जाता आपली वेगळी वाट निवडतो त्याला आपण "वेडा" म्हणून संबोधतो....त्याच्याकडे आपण नेहमी संशयाच्या नजरेने पाहतो ....पण तो आपली चाकोरी सोडून जरी वागत असला तरी त्याच्याकडे नवनिर्मितीच्या संकल्पना असतात हे आपण नेहमी दुर्लक्षित करीत असतो...अश्या वेड्यांनीच नव-नवीन शोध लावलेले आहेत हे आपण विसरतो...असे वेडे या जगात आहेत म्हणूनच आपण ऐषारामात राहू शकतो हे आपण विसरतो... या वेड्यांनी आपले सर्व जीवन समाजासाठी काहीतरी नवीन शोधण्यात घालविले म्हणून आपण जीवनाचा संपूर्ण आनंद घेऊ शकतो आहोत हे आपण विसरतो....या खऱ्याखुऱ्या माणसांना आपण विसरतो ......हे विसरत असतांना बहुतेक आपण हे पण विसरत असतो की या "वेड्या"समोर आपण अजूनही "माकडे" च आहोत...!
"माणसाचं मन "...एक विचित्र रसायन.....! हे लिहिता लिहिता मी सुद्धा थोडे विषयांतर केले आहे असे मला आता वाटू लागले आहे .... लिहितांना काही वेगळेच लिहायचे होते,,,लिहिले काही वेगळेच .......असा काहीसा प्रकार झाला आहे असे वाटते आहे ... तरी सुद्धा जे लिहिले ते वाचनीय असेल तरच वाचा अन्यथा "माकडचाळे" करू नका हीच विनंती......! आता संपवितो.... राहिलेले सर्व पुन्हा कधी...तरी...!!
No comments:
Post a Comment