आज प्रथमच काहीतरी लिहिण्याची संधी मिळतेय. तसं पाहिलं तर अनेक वेळा अनेकांनी मला लहानपणापासून आतापर्यंत म्हणजे वयाच्या पन्नाशी पर्यंत लिहायला भाग पाडलेल आहे. लहानपणी शिक्षकांनी लिहायला सांगितलेल्या निबंधापासून तर कालपर्यंत साहेबांनी dictate केलेल्या पत्रांपर्यंत आजतागायत काही ना काही तरी लिहितोच आहे. परंतु ते लिखाण म्हणजे कर्तव्य पूर्तीचा एक भाग ! शिक्षकांच्या छडीचा मार असो किंवा साहेबांच्या तोंडचा भडीमार असो ....तो चुकविण्यासाठी असे जबरदस्तीने मी अनेकवेळा असंख्य लिखाण केलेले आहे. इंटरनेट वर बसून रात्र रात्र जागणाऱ्या माझ्या मुलाकडे मी आज एक इच्छा प्रदर्शित केली ....मी त्याच्या laptop वर चाललेल्या कामात (बहुधा कुणाशीतरी चाटींग असावे,,,) व्यत्यय आणून म्हणालो......"अरे सनी...."
त्याने काम्पुटरमधली मान वर न करताच "काय ..." अश्या अर्थाने मान हलविली..
"मलाही शिकव ना....." मी चाचरत काहीतरी पुटपुटलो ...!
यावेळी मात्र त्याने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहिले....
इंटरनेट........! इंटरनेट शिकव ना मलापण .....!
एखादे भूत बघितल्यासारखी त्याची चर्या बघून मलाच माझी लाज वाटू लागली ....
मी काहीही बोलायच्या आत तो किंचाळला ...."काय हे बाबा...."
'का...? काय झालं......?.....मी
"इंटरनेट काय शिकायची गोष्ट आहे...?"
"मग....."
"अहो असं शिकवून कधी कुणाला इंटरनेट येते का ?"
"मग कसं येते ?"
"ते आपलं आपणच शिकायच असते !"
"मी नाही का तुला लहानपणी सायकल शिकवली..."
"ते वेगळं आहे..."
"....नंतर मोटरसायकल शिकवली...."
"ते वेगळं हो.... "
"त्याच्याही आधी तुझा हात धरून तुला पायी चालायला शिकवलं होतं...."
आता मात्र त्याच्या सहनशक्तीचा अंत झालेला होता.......
त्याने विचित्रपणे माझ्याकडे पहिले...... आपला laptop बाजूला ठेवला..."तुम्हाला काय हवंय....?"
"मला इंटरनेट शिकायचं आहे .... "
"मी सांगितलं नं यार मघाशी तुम्हाला ..... आणि लहानपणी सायकल शिकवतांना किती वेळा पाडलं मला ...."
"मग आता तू पाड मला.. "
"त्यापेक्षा तुम्ही यात पडूच नका ना..."
"ठीक आहे...." मी चेहेरा पाडून म्हणालो....
माझ्या पडलेल्या चेहेऱ्याकडे पाहून त्याला वाईट वाटले असावे बहुधा .... तो म्हणाला ..."मी तुम्हाला एक ब्लॉग उघडून देतो तुम्ही त्यात काहीतरी लिहित जा....."
"ब्लॉग म्हणजे काय...?"....मी काहीही न समजून विचारले....
"ते काही विचारून मला बोअर करू नका ....अमिताभ बच्चन कसं त्याच्या ब्लॉग वरून लिहितो तसं तुम्ही तुमच्या ब्लॉग वरून लिहित जा....."
लिहिण्याच्या विचाराने माझ्या पोटात गोळा उठला ....आणि ....लहानपणापासूनच्या माझ्या शत्रूंच्या यादीमध्ये मी माझ्या मुलाचे नाव add केले ..!
तो पुढे म्हणाला ...."तुम्ही ब्लॉगवर दररोज काहीतरी लिहित जा..."
"पण ते वाचणार कोण...?"
"वाचणारे वाचतील ...नाहीतर नाही वाचणार....... पण तुम्ही यामुळे हळूहळू इंटरनेट शिकून जाल.....!"
मला ही कल्पना खूप आवडली. मी लगेच होकार भरला.. त्याने माझे ब्लॉग वर खाते उघडले..व मी शुभस्य शीघ्रम ...या उक्तीप्रमाणे लगेच कामाला लागलो व त्याचे परिणाम तुम्ही पाहताच आहात .............!!!
धन्यवाद...!
ekduuum zhakaas baba...
ReplyDeletemajja yenar tumcha blog vaachayala!!!!