Friday, 20 January 2012

मैत्री ....एक सुखद अनुभव....!

    परवाच पब्लिक स्कूल च्या वार्षिक मेळाव्याला जाऊन आलो. जुनी मित्र मंडळी भेटली. त्यांच्या सहवासात दीड दिवस घालवले. वेळ कसा निघून गेला ते समजलंच नाही. बालपणीची ती मित्र मंडळी, ज्या वयात काहीही कळत नव्हतं, आई -वडील, भाऊ-बहिणी व फारतर आपले गुरुजन-जवळची नातेवाईक मंडळी यापेक्षा आणखी काही नाती असतात, मित्रांचाही आपल्या आयुष्यात फार मोठा सहभाग असतो, हे न कळण्याच्या, मित्र म्हणजे आपल्या लेखणीच्या बदल्यात आपल्याला चिंचा-बोरं देणारा, आपल्या डब्यातले पदार्थ आवडले तर त्याच्या डब्यातील त्याचा नावडता पदार्थ आपल्याला ऑफर करून त्याबदल्यात त्याच्या आवडीचा आपल्या डब्यातील पदार्थ मागणारा, वेळ प्रसंगी इतर वर्गामित्रांसमोर जाणीवपूर्वक आपली फजिती करणारा, विनाकारण आपले नाव गुरुजींना सांगणारा, त्यांनी शिक्षा केल्यानंतर आनंदी होवून फिदीफिदी हसणारा, आपल्या यशामुळे नाराज तर अपयशाने खुश होणारा - असा एखादाच स्मरणात राहणारा - त्यालाच कमी अधिक फरकाने मित्र समजण्याच्या कोवळ्या, म्हणजे वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी आम्ही आपले घरदार, आई-वडील, भाऊ-बहिणी यांना सोडून "शासकीय विद्यानिकेतन , चिखलदरा " येथे पुढील शिक्षणा साठी शाळेच्या वसतिगृहात राहावयास आलो होतो.  पहिला दिवस तर नुसता भांबावलेल्या अवस्थेत गेलेला. हळूहळू प्रत्येक जण आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊ लागलेला..! सांगायचा उद्धेश हाच की काहीही न कळण्याच्या कोवळ्या वयात आम्ही एकत्र आलो होतो. त्यावेळी कोणीही कोणाचा परिचित नव्हता... काही मुलाच्या गावातील मुले आमची सिनियर्स होती...त्या मुलांना त्या सिनियर्स चा आधार असायचा...इतकेच...! बाकी मात्र सगळीकडे काळोखाच होता..! हळूहळू आम्ही त्या वातावरणात रुळलो. काही काळानंतर एक संपूर्ण सत्य आम्हाला पटू लागलेलं होतं....इथे जे कुणी आहोत ते आपले आपणच आहोत....आम्हीच आमचे भाऊ बहिणी होतो आम्हीच आमचे आई-बाप होतो ...कुठल्याही संकटाला आमचे आम्हालाच तोंड द्यायचे होते...कुठलीही जटील समस्या आमची आम्हालाच सोडवायची होती....तिथे वडीलधाऱ्यांची कवच कुंडले नव्हती .....आईच्या मायेची उब नव्हती....! परिस्थिती अटळ होती...जगणे अनिवार्य होते...!!
     अशा परिस्थितीत आम्ही एकत्र आलेलो...हळूहळू कधी एकमेकांचे मित्र बनलो ते कळलंही नाही...आयुष्याची अशी संपूर्ण सहा वर्षे आम्ही एकत्र राहिलो....खेळलो.....भांडलो.....एकमेकांच्या खोड्या काढल्या .....एकमेकांना चिडविले......एकमेकांशी स्पर्धा केली......मारामाऱ्या केल्या....अबोला धरला ....   अबोल्यावरून आठवले ....एकमेकांशी अबोला असला की ती गोष्ट इतरांना लगेच समजे मग सर्व त्या अबोल्याला एन्जॉय करायचे.....चांगला मुहूर्त ....दसरा, संक्रांत ,होळी, अथवा अन्य कुठलाही शुभ दिवस पाहून दोघांना जबरदस्तीने दहापाच जण पकडून ठेऊन एकमेकांशी बोलायला भाग पडायचे....! अर्थात त्या दोघांनाही हे हवेसेच असायचे पण त्या वयातही प्रत्येक जण आपापला इगो जपून असायचा....! पहिल्यांदा मी बोलणार नाही हे मनोमन ठरविलेले असायचे....!बोलावेसे तर वाटायचे पण बोलायचे कसे....कमीपणा घ्यायचा कसा....ही समस्या इतर मित्र अशाप्रकारे सोडवायचे.
     सहा वर्षे अशीच निघून गेली....कालानुरूप आम्ही बदलत होतो...एकमेकांच्या साथीने मोठे होत होतो...एकमेकांच्या सुख दुखात हसत रडत होतो...आम्ही असे एकमेकात गुंतलो होतो....हे आम्हाला त्या वेळी समजलेलं नव्हतं....नसावं.....ते वयच तसं होतं ....आम्ही जिवलग मित्र बनलो होतो पण त्याची त्यावेळी जाणीव नव्हती ....शाळा सोडली.....पुढील शिक्षण....जीवनाचा संघर्ष....स्वतः च्या पायावर उभे राहण्याची धडपड.....यात आठ दहा वर्षे निघून गेलेली....त्या आठ दहा वर्षात पुन्हा अनेकांशी संपर्क....अनेक मित्र ....काही कॉलेज मधले .....काही नोकरीला लागल्यानंतर झालेले.....प्रत्येकाची पातळी वेगळी .....कुवत वेगळी.....मैत्रीतली ओढ वेगळी....! आतापावेतो आम्ही वयाने खूप मोठे झालेलो....असंख्य ओळखी ....असंख्य मित्र.....असंख्य परिचित....ज्ञानाच्या कक्षा रुंदावलेल्या....लहानपणी अनुभवलेली गरिबी संपलेली....! आयुष्य थोडं स्थिरावलेलं .......सारी सुख आवाक्यात आलेली.....अशावेळी जाणवली एक अनामिक हुरहूर.....एक पोकळी.....काहीतरी चुकल्याची जाणीव....काहीतरी निसटल्याची संवेदना .....मनाला लागलेली पण न कळणारी ....न उलगडणारी वेदना....! आयुष्याची सहा वर्षे ज्यांच्या सोबतीने ....आधाराने....घालविले ते मित्र कुठे असतील.....काय करीत असतील.....त्या काळात फोन नव्हते ....पत्रव्यवहार चालायचा.... कालांतराने तो कमी कमी व्हायचा....! ही मनाची तडफड एकट्याची नाही....बहुतेक आम्हा साऱ्यांचीच .....म्हणून आम्ही एकमेकांना महत्प्रयासाने शोधले....एकमेकांच्या संपर्कात आलो.....आणि ठरविले बालपणीचे ते दिवस वर्षातून दोन दिवस का होईना ...पण जगायचे....जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा ......पूर्वी सारखे एकमेकांच्या सुख दुखात सहभागी व्हायचे...मोकळेपणाने हसायचे....सर्व जग विसरायचे...लहानपणीची निखळ मैत्री अशीच कायम ठेवायची....त्यातून ह्या मेळाव्याचा जन्म झाला ...या दोन दिवसात आम्ही आमचं बालपण पुन्हा जगतो....! कारण त्या कोवळ्या वयातच आम्हाला मैत्री या शब्दाचा अर्थ कळला होता.......त्या शब्दाची व्याप्ती किती मोठी आहे ते कळलं होतं....आणि कळलं होतं मैत्री एक नातं नाही ........तो एक अनुभव आहे.....एक सुखद अनुभव...!!!
मैत्री ....एक सुखद अनुभव....!

No comments:

Post a Comment